Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक कमाईमुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मंदिराचे एकूण उत्पन्न १३३ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त आहे.
मंदिराच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा भाविकांनी दिलेल्या देणग्या आणि प्रसादाचा होता. याशिवाय पूजा आणि इतर धार्मिक विधींमधून २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दानपेटी, ऑनलाइन पेमेंट, धार्मिक विधी, प्रसाद विक्री, सोने-चांदीचा लिलाव अशा विविध स्त्रोतांतून मंदिराला उत्पन्न मिळते. प्रसादात वापरले जाणारे लाडू आणि नारळाच्या वाडय़ांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्याने दिली. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दररोज सुमारे १० हजार लाडूंचे वाटप केले जाते.
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या लिलावातून विक्रमी १.३३ कोटी रुपयांची कमाई झाली, जी गेल्या वर्षीच्या ७५ लाखांच्या जवळपास दुप्पट आहे. मंदिरातील भाविकांची वाढती संख्या आणि प्रशासकीय सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) मंदिराचे एकूण उत्पन्न १५४ कोटींपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मंदिर ट्रस्ट आपल्या उत्पन्नाच्या २० टक्के रक्कम समाजोपयोगी कामांवर खर्च करते. यामध्ये वैद्यकीय मदत, डायलिसिस सेंटर चालविणे, १८ प्रकारच्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत अशा सुविधांचा समावेश आहे. याशिवाय ट्रस्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बुक बँकेची सुविधा उपलब्ध करून देते आणि मंदिराच्या आवारात अभ्यासिकादेखील चालवते.
ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही ट्रस्ट उचलते. भाविकांनी दिलेली देणगी आणि प्रसाद समाजाच्या कल्याणासाठी वापरला जावा, याची आम्ही काळजी घेतो. येत्या काळात भाविकांची संख्या आणखी वाढेल, त्यामुळे उत्पन्नात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा आणि तांत्रिक सुविधांचा विस्तार यामुळे मंदिराची सेवा अधिक पद्धतशीर आणि परिणामकारक होत आहे.
संबंधित बातम्या