मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivadi Court : संजय राऊत यांच्यावर नवं संकट; कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट

Shivadi Court : संजय राऊत यांच्यावर नवं संकट; कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 06, 2023 03:19 PM IST

Warrant against Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील शिवडी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut (PTI)

non bailable warrant against mp sanjay raut : पत्रा चाळ पुनर्विकासातील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मिळालेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पुन्हा संकटात सापडले आहेत. मानहानीच्या एका प्रकरणात राऊत यांच्याविरोधात शिवडी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केल होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयानं मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन होऊन त्यांचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सरकारमधील मंत्री व नेत्यांविरोधात आघाडी उघडली होती. अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान प्रकरणातील वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणत भाजपला कोंडीत पकडणाऱ्या नवाब मलिक यांच्यावरही कालांतरानं कारवाई झाली. संजय राऊत यांनाही एसआरएच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल १०२ दिवस तुरुंगात राहून ते जामिनावर सुटले.

तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकारचा बचाव करताना संजय राऊत हे भाजपवर अक्षरश: तुटून पडत होते. त्यांनी भाजपच्या काही नेत्यांवर जोरदार आरोप केले होते. त्यात किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. सोमय्या दाम्पत्यानं १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तूनही त्यास प्रसिद्धी देण्यात आली. या आरोपांमुळं आपली बदनामी झाल्याचा आरोप करत मेधा सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याच प्रकरणाची सुनावणी आता सुरू झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग