मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राणा दाम्पत्याला जामीन, पण कोर्टानं घातल्या ‘या’ अटी

राणा दाम्पत्याला जामीन, पण कोर्टानं घातल्या ‘या’ अटी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 04, 2022 01:05 PM IST

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.

रवी राणा - नवनीत राणा
रवी राणा - नवनीत राणा

राजद्रोहाच्या आरोपाखाली २३ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना न्यायालयानं राणा दाम्पत्याला काही अटी घातल्या आहेत.

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेत मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका मनसेनं जाहीर केल्यानंतर अचानक राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अमरावतीहून थेट मुंबई गाठली होती. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. तरीही राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम होते. त्यातून मुंबईत दोन दिवस तणावाचं वातावरण होतं. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी राणा दामप्त्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा व राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ एप्रिलला न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली होती. तेव्हापासून रवी राणा हे तळोजा कारागृहात तर नवनीत राणा या भायखळा कारागृहात होत्या. त्यांच्या जामिनावरील निर्णय दोन वेळा लांबणीवर पडला होता. आज अखेर न्यायालयानं प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व काही अटी घालून त्यांची सुटका केली.

राणा दाम्पत्याला न्यायालयानं घातलेल्या अटी:

जामिनावर असताना मीडियाशी बोलण्यास मज्जाव. उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार.

जामिनावर असताना दुसरा कुठलाही गुन्हा करू नये.

तपासावर प्रभाव टाकण्याचा किंवा साक्षीदारांना फितवण्याचा प्रयत्न करू नये.

नवनीत राणा रुग्णालयात

नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्यानं नुकतंच त्यांना भायखळा तुरुंगातून जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. जामिनाची पूर्तता झाल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात हलविलं जाण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग