IMD on Mumbai Rain : मुंबईत आज अतिवृष्टीचा अंदाज, अति उंचीच्या लाटा उसळणार; घराबाहेर न पडण्याचंं बीएमसीचं आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IMD on Mumbai Rain : मुंबईत आज अतिवृष्टीचा अंदाज, अति उंचीच्या लाटा उसळणार; घराबाहेर न पडण्याचंं बीएमसीचं आवाहन

IMD on Mumbai Rain : मुंबईत आज अतिवृष्टीचा अंदाज, अति उंचीच्या लाटा उसळणार; घराबाहेर न पडण्याचंं बीएमसीचं आवाहन

Updated Jul 13, 2024 01:11 PM IST

IMD on Mumbai Rain : भारतीय हवामान खात्यानं आज मुंबईत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुपारी ३.६९ मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज अतिवृष्टीची शक्यता; मुंबई महापालिकेचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
मुंबईत आज अतिवृष्टीची शक्यता; मुंबई महापालिकेचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन (Reuters)

IMD on Mumbai Rain : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच, भारतीय हवामान खात्यानं आज मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

मुंबई महापालिकेनं (BMC) आज ‘हाय टाइड’चा इशारा दिला आहे. आज दुपारी ४ वाजून ३९ मिनिटांनी ३.६९ मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं खूप आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचना महापालिकेनं मुंबईकरांना दिल्या आहेत.

अंधेरी सब-वे तात्पुरता बंद

आर्थिक राजधानीतील अनेक भागांत पाणी साचत असल्यामुळं प्रशासनानं वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. त्यानुसार, अंधेरी भुयारी मार्ग पाणी साचल्यामुळं तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक एस.व्ही.रोडवर वळविण्यात आली आहे. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

तापमान २९ ते २४ अंशांदरम्यान राहणार

८९ टक्के आर्द्रतेसह शनिवारी शहरातील कमाल व किमान तापमान २९ ते २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं १६ जुलैपर्यंत आकाश ढगाळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम होताना दिसत असल्याचं मुंबई विमानतळावरील परिस्थितीवरून स्पष्ट झालं आहे.

एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

खराब हवामान आणि पाणी साचण्याच्या समस्येमुळं मध्य रेल्वेनं एलटीटी - केसीव्हीएल एस/एफ एक्स्प्रेसचं (ट्रेन क्रमांक २२११३) वेळापत्रक बदललं आहे. ही गाडी ७ तास उशिरानं धावणार आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दुपारी ४.४५ वाजता सुटणार होती, पण आता ती रात्री ११.४५ वाजता सुटेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर