Mumbai Waterlogging: सोमवारी (०८ जुलै २०२४) दिवसभर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह लोकल गाड्यांच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यामुळे लोकस सेवा सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. मात्र, वडाळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले असून हार्बर मार्गावरील गाड्या अजूनही उशीराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने मध्य रेल्वेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळा स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. परिणामी, हार्बर मार्गावरील सेवा काही मिनिटे उशिराने धावत आहेत. एएनआय आपल्या ट्विटमध्ये वडाळा स्थानकाच्या रेल्वे रुळावर पाणी साचल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. दरम्यान, “मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रवाशांनी अपरिहार्यतेशिवाय प्रवास करणे टाळावे", असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ठाणेसह पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. तर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातही पावासाचा यलो अलर्ट जाही करण्यात आला.
हवामान विभागाने मुंबईत आज (९ जुलै २०२४) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.