Mumbai Rain Updates: मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, ज्याचा परिणाम बेस्ट बस आणि लोकल सेवेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवा संथ गतीने धावत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेने बदलापूर, कल्याण आणि वाशी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेन रखडल्या आहेत. वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल बंद आहेत. सीएसएमटी येथून ठाण्यापर्यंतच लोकल चालवल्या जात आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने ठाण्यापुढील लोकल सेवा (अप आणि डाऊन) बंद पडल्या आहेत. ठाणे, कुर्ला, दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. याचपार्श्वभूमीवर बदलापूर, कल्याण आणि वाशी परिसरातील नागरिकांनी माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
सोमवारी मध्यरात्री एक ते सकाळी सात या सहा तासांत मुंबईत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईमधील सर्व बीएमसी, शासकीय व खासगी शाळा व महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर करण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
१) १२११० (एमएमआर-सीएसएमटी)
२) ११०१० (पुणे-सीएसएमटी)
३) १२१२४ (पुणे सीएसएमटी डेक्कन)
४) ११००७ (पुणे-सीएसएमटी डेक्कन)
५) १२१२७ (सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस)
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर मध्य मार्गावरील सायन आणि भांडुप स्थानकांवरील रेल्वे सेवा मात्र पुन्हा सुरू करण्यात आली.मुंबईत पावसामुळे पाणी साचल्याने बेस्टच्या अनेक बसेस नियमित मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. मुंबईत पावसामुळे किंग्ज सर्कल येथे पादचारी आणि वाहने मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले रस्ते ओलांडताना दिसत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्लेजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या