Mumbai Local Train Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज मुंबई, ठाणे व नवी मुंबईला झोडपून काढले. मुंबईत पावसाबरोबरच धुळीचे वादळ आल्याने सर्वत्र धूळच धूळ दिसत होती. कल्याण, डोंबिवली या भागांत भरदुपारीच काळे ढग दाटून आल्यानं दिवसाच रात्र झाल्याचे वाटत होते. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली. मुंबईत घाटकोपरमधील छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावर १२० फुटी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १०० जण अडकले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर वडाळा भागात पार्किंग लिप्ट कोसळून १० गाड्यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. घाटकोपर, ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुंडून गर्दी दिसत आहे.
मध्य रेल्वेमार्गावर मुंलुंड आणि ठाणे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दुपारपासून विस्कळीत झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा खांब रेल्वेमार्गावर कोसळला. यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली. यामुळे ठाणे आणि घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बॅनर कोसळल्याने ती वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती जी आता मार्गावर येते आहे. मध्ये रेल्वे विभागाने एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
ठाणे आणि मुलुंड दरम्यान खांब कोसळल्याच्या घटनेची मध्य रेल्वेने तातडीने दखल घेत तत्काळ कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच रेल्वेसेवा पूर्ववत होणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकल सेवा कोलमडल्याने प्रवासी रस्तेमार्गाने जात असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
आज ऑफिसला जाण्याचा आठवड्याचा पहिला दिवस होता. मात्र घरी परतणाऱ्या नोदरदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळी गर्दीच्या वेळेसच मध्य मार्गावरील लोकल सेवा कोलमडल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे रुळावर एकामागे एक लोकल ट्रेन थांबल्याचे दिसत होते. लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी रुळावरून पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या