Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना

Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना

Oct 10, 2024 10:52 PM IST

Mumbai rain Update :महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे.

मुंबईला परतीच्या पावसाचा तडाका
मुंबईला परतीच्या पावसाचा तडाका

नवरात्रीत मुंबईला परतीच्या पावसाने जोरदार तडाका दिला आहे. मुंबई व उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईतील दादर, लोअर परेल व दक्षिण मुंबईला सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला व कोकणातील जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने नवरात्रीतील दांडिया व रास गरब्याचा चांगलाच रसभंग झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात मुसळधार पाऊस बरसला.

अचानक कोसळलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. जवळपास पाऊण ते एक तास मुसळधार पावसाने झोडपले. मुंबई व उपनगरांसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्येही जोरदार पाऊस कोसळला. नवी मुंबई, पणवेलमध्ये अचानक कोसळलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे गरबा व दांडिया रसिकांचा हिरमोड झाला. पावसामुळे गरबा अर्ध्यात थांबवण्यात आला. पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून लोकल सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. 

मुंबईत आज हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाज होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळनंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्र व घाट माथ्यावरही जोरदार पाऊस बरसला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दुपारी जोरदार सरी कोसळल्या.  गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने ठाण मांडले असून आज कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा तडाका जाणवत होता. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पतीचा पाऊस कोसळत आहे. 

 परतीच्या पावसाने केळी, सोयाबीन, मका आणि कापूस पिके पाण्याखाली गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अनेक जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनची काढणी आणि मळणी खोळंबली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भात पिकाला देखील या पावसाचा मोठा फटका बसत असून सांगलीत द्राक्ष पिकांच्या छाटणीला या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसत आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर