India Alliance: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या ६७ दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. यानिमित्त इंडिया आघाडीने भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी देशभरातील नेत्यांनी शिवाजी पार्कवर उपस्थिती दर्शवली आहे.
या सभेसाठी काँग्रेस नेत्यांसह आरजेडीचे तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दीपंकर भट्टाचार्य आणि इतर अनेक नेते या सभेत सहभागी झाले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा हे राहुल गांधींच्या सभेत सहभागी झाले नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू झाली. राहुल गांधी यांची पदयात्रा मुंबई मार्गावर सुरू झाली असून, ती मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी असेल. त्याला न्याय संकल्प पदयात्रा असे नाव देण्यात आले आहे. या मोर्चात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सेलिब्रिटीही सहभागी होत आहेत. आज त्यांच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे.