मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Property tax news : मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार

Property tax news : मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 21, 2024 04:42 PM IST

मुंबईकर नागरिकांना सुलभपणे मालमत्ता कर (Property tax) भरता यावा यासाठी शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालये उघडी ठेवली जाणार आहे.

मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार
मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार

३१ मार्च २०२४ हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी मुंबईकर नागरिक मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालयांत जात आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये २३ आणि २४ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. तसेच २५ मार्च रोजी धुलिवंदन आणि २९ मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मालमत्ता करभरणा करण्यासाठी सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या कालावधीत गैरसोय होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

नागरिकांना सुलभपणे कर भरता यावे यासाठी मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या काळात प्रत्येक विभागांमध्ये उपलब्ध असणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलित करणे सुरू आहे. २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर ठळक बॅनर तसेच स्थानिक केबल, मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांना करभरणा करताना येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी या कालावधीत करसंकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही संबंधित विभागांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

२० मार्च २०२४ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या मुंबईतील ‘टॉप टेन’ मालमत्ता करधारकांची यादी-

१) न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – १४ कोटी ४८ लाख ८९ हजार २४१ रुपये

२) श्री. साई ग्रुप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) – १४ कोटी ०७ लाख ९४ हजार ९८३ रुपये

३) कल्पतरू रिटेल व्हेंचर्स प्रा. लि. (एच पूर्व विभाग)- १० कोटी ७० लाख ७२ हजार १६२ रुपये

४) एव्हीएएलपी (आर मध्य विभाग)- १० कोटी ३८ लाख ७१ हजार ६६८ रुपये

५) न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – ०८ कोटी ९२ लाख ४४ हजार ६३१ रुपये

६) पीआरएल अगस्त्य प्रा. लि. (एल विभाग)- ०७ कोटी ४२ लाख ९५ हजार ८९४ रुपये

७) चंपकलाल के वर्धन आणि कंपनी- (जी उत्तर विभाग)- ०४ कोटी ९४ लाख ९१ हजार ०७० रुपये

८) केबल कॉर्पेारेशन ऑफ इंडिया- (आर मध्य विभाग) ०३ कोटी ५४ लाख ७० हजार २५३ रुपये

९) द टिंबर मार्केट (ई विभाग)- ०१ कोटी ५४ लाख १० हजार ४३८ रुपये

१०) सुप्रीम सुखधाम (एच पश्चिम विभाग)- ०१ कोटी २२ लाख २४ हजार ३५२ रुपये

WhatsApp channel

संबंधित बातम्या