Mumbai News: मुंबईतील एका शाळेत मुलांना प्रवेश देताना अर्जाद्वारे पालकांकडे काही खाजगी गोष्टी विचारल्या जात असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडअप कॉमेडियन श्रीधर व्ही यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर चर्चेला उधाण आले. पालकांना विचारण्यात येणारा प्रश्न त्यांच्या मुलाच्या करिअरशी जुडीत असायला हवा आणि पालकांच्या खाजगी गोष्टींशी त्याच्या काहीही संबंध नसला पाहिजे, असा सल्ला पालकवर्गाकडून दिला जात आहे.
श्रीधर व्ही यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला, जो मुंबई येथील एका शाळेतील प्रवेश अर्ज असल्याचे समजत आहे. श्रीधर व्ही यांनी हा स्क्रीनशॉर्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, मुंबईतील शाळेत मुलांना प्रवेश देताना काय विचारले जात आहे, ते पाहा! हे प्रीस्कूलसाठी आहे.' या स्क्रीनशॉर्टमध्ये पालकांना आपल्या मुलाची प्रसूती कशी झाली? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पालकांसमोर नॉर्मल, प्री-मॅच्युर आणि सर्जरी अशी तीन पर्याय ठेवण्यात आली आहेत. मात्र, ही गोष्ट पालकांना खटकली आहे. प्रसूतीची पद्धत ही एक खाजगी बाब आहे. त्याचा मुलाच्या शिकण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.
श्रीधर व्ही यांनी काल रात्री १० वाजता ही पोस्ट केली होती. तेव्हापासून या पोस्टला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. तर, हजारो लोकांनी आपले मत मांडले आहे. याशिवाय, या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, अनेकांनी संबंधित शाळेवर टीका केली आहे.
मुलाची प्रसूती कशी झाली, याच्याशी शाळेचा काहीही संबंध नाही. मी माझ्या मुलाला अशा शाळेत पाठवण्यास कधीच होकार देणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. नीलिमा श्रीवास्तव नावाच्या युजरने दिली आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'पण हा प्रश्न मुलाच्या शिक्षणात कुठे आडवा येतो?' आणखी एका युजरने म्हटले आहे की, या प्रश्नामुळे या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर, कोणत्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी मुलाचा जन्म कसा झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि का?' असा प्रश्न एकाने उपस्थित केला.
श्रीधर व्ही यांनी पुढे अशीही माहिती दिली आहे की, हा अर्ज फक्त मुलाच्या आईनेच भरावा, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे. बहुतेक लोकांना हे सर्वसमावेशक नाही, असे वाटते. मुलाच्या मुलाखतीलाही फक्त आईनेच उपस्थित राहावे, अशीही विनंती करण्यात आली आहे.
श्रीधर व्ही यांच्या यूट्यूब बायोनुसार ते आयआयएम कॉमिक या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. ते त्याच्या यूट्यूब चॅनेलवर चालू घडामोडींवर गंमतीशीर भाष्य करतात. तसेच भारत आणि जगभरातील बातम्यांवर आपले विनोदी विचार आणि अद्वितीय दृष्टीकोन लोकांसमोर मांडतात.