Mumbai Police News: मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले बीएमसी मैदानाच्या लोखंडी गेट आणि सुरक्षा भिंतीला विद्युत करंट बसत असल्याची माहिती पायधुनी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस शिपाई शरद कुलाल यांनी घटनास्थळी जाऊन विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून तेथे बोलावून घेतले. तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या मदतीने मैदानात खेळत असलेल्या ३० हून अधिक मुलांना मैदानाबाहेर काढले. शरद कुलाल यांच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. "पायधुनी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस शिपाई शरद कुलाल पायधुनी परिसरातील बीएमसी मैदानाच्या लोखंडी गेटला व भिंतीला विद्युत करंट बसत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी सदर ठिकाणी तातडीने जाऊन मुंबई अग्निशमन दलाच्या मदतीने मैदानात खेळत असलेल्या ३० हून अधिक मुलांना बाहेर काढले व धोकादायक विद्युत गळतीपासून होणारा संभाव्य धोका टाळला. तसेच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून तेथे बोलावून घेतले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे!", अशा आशयाची पोस्ट मुंबई पोलिसांनी केली.
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे समुद्रात बुडणाऱ्या महिलेला पाहून दोन पोलीस कॉन्स्टेबल यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेत तिचे प्रमाण वाचवले. किरण ठाकरे आणि अनमोल दहिफळे असे पोलीस कॉन्स्टेबल यांची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मरीन ड्राइव्हच्या सुंदर महल जंक्शनजवळ बुडण्याच्या घटनेनंतर कर्तव्यावर असलेले अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण ठाकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अनमोल दहिफळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून समुद्रात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. त्यानंतर मरिन ड्राइव्ह १ मोबाइल व्हॅनने महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली असून तिच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे."
मुंबईतील गोरेगाव परिसरात रविवारी धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना वीजेचा शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आदिल चौधरी असे वीजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आदिल हा इयत्ता पाचवीत शिकत असून रविवारी तो आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी मीनाताई ठाकरे ग्राऊंड येथील मैदानात गेला. क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू म्हाडाने बांधलेल्या पोलीस चौकीच्या छतावर गेला. हा चेंडू काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याला विजेचा धक्का लागला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या