Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे फुटले बिंग, ४ पोलीस निलंबित
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे फुटले बिंग, ४ पोलीस निलंबित

Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे फुटले बिंग, ४ पोलीस निलंबित

Updated Aug 31, 2024 11:14 PM IST

Mumbaipolice : पोलिसांनी एका व्यक्तीला पकडण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज
अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज

वाकोला परिसरात कारवाई करत एका व्यक्तीची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं पोलिसांना महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंगझडती घेताना एका सामान्य नागरिकाच्या खिशात पोलिसांनीच ड्रग्जची पुडी टाकली. परंतु हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. खार पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून राज्यभरात अमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांचा एक संतापजनक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला पकडण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित व्यक्तीसोबत ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथल्या सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. फुटेज दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकार -

मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तैनात चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करताना एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक केली. पोलिसांच्या या काळ्या कारनाम्याची कहाणी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे त्या व्यक्तीचे निर्दोषत्व सिद्ध झाले व मोठ्या कारवाईपासून त्याची सुटका झाली. या घटनेनंतर खार पोलीस ठाण्यातील चार अधिकाऱ्यांविरुद्ध तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

खार पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अधिकारी डॅनियल नावाच्या व्यक्तीच्या खिशात एक वस्तू ठेवताना दिसत आहे. त्यानंतर त्याला २० ग्रॅम मेफेड्रोन ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

ज्या व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवण्यात आले होते त्याचे नाव डॅनियल असे आहे. हा व्यक्ती शाहबाज खान यांचा कर्मचारी आहे. शाहाबाज खान यांचे कलिना परिसरात जनावरांचे फार्म आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षापासून ते या जमिनीची काळजी घेत आहेत. अनेक बिल्डर आणि स्थानिक राजकारणी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असतात. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. यामध्ये माझ्यासोबत तिथे काम करणाऱ्या डॅनियलला यात गोवण्यात आले. मात्र सुदैवाने ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने खरा प्रकार उजेडात आला.

खान यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी डॅनियलकडे आले होते. त्यानंतर त्यांनी त्याला अटक केली. मात्र जेव्हा मी सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तेव्हा स्पष्टपणे दिसत होते की अधिकारी डॅनियलच्या खिशात काहीतरी टाकत आहे आणि नंतर ते बाहेर काढून त्याला ताब्यात घेत आहेत. हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर, त्याला रात्री नऊ वाजता त्याला सोडण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर