Udhayanidhi Stalin Sanatana Dharma Remark: सनातन धर्माबाबत वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि राज्याचे युवा कल्याण- खेळ विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी उदयनिधींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उदयनिधींविरोधात शिंदे गटाने आक्रमक भुमिका घेतली असून ठिकठिकाणी आंदोलन करण्याचीही तयारी दर्शवल्याची माहिती आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (२ सप्टेंबर २०२३) चेन्नई येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर भाष्य केले होते. त्यावेळी उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली. यानंतर देशातील राजकारणाने पेट घेतला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना पत्र लिहून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेले वक्तव्य समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवणारे आणि अनेकांच्या भावना दुखवणारे आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी”, अशी विनंती राहुल कनाल यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
“काही गोष्टींना विरोध करता येत नाही., फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्याला हे संपवायचे आहे. अशाचप्रकारे सनातन धर्माला संपवायचे आहे. सनातन धर्माला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे,सनातन हे नाव संस्कृतमधून आले. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.”