Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश

Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश

Jan 03, 2025 10:37 AM IST

Mumbai Traffic Rules: मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर येत असून यापुढे डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई : वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार
मुंबई : वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार

Mumbai Police: मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. यापुढे डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत. याबाबत मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. बहुतेक लोक कागदपत्रे सोबत बाळगण्याऐवजी मोबाईलवर डिजिलॉकर किंवा एम परिवहन यांसारख्या ॲपवर डिजिटल स्वरुपात ठेवतात. मात्र, वाहतूक पोलीस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनधारकांवर कारवाई करायचे. यासंदर्भात वाहनधारकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर वाहतूक सहपोलीस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'वाहनधारक डिजिटल कागजपत्रे दाखवल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, यापुढे डिजिलॉकर आणि एमपरिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्यात आलेले चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पीयुसी ग्राह्य धरण्यात यावे.' यामुळे आता वाहनधारकांची अडचण दूर झाली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजिटल लॉकर आणि एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली. डिजिलॉकर आणि एमपरिवहन अ‍ॅपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध मानली जाईल. माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ नुसार चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमाअशा कागदपत्रांची प्रत्यक्षप्रद दाखवणे बंधनकारक नाही, असे स्पष्ट सांगितले होते. सर्व राज्यांच्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या. मात्र, तरीही डिजिटल कागदपत्रे दाखवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात होती. याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवर नियम मोडणाऱ्यांवर बारीक नजर ठेवणाऱ्या मुंबई वाहतूक पोलिसांनी चालान काढून तब्बल ८९ लाख रुपये वसूल केले. मुंबईकर २०२५ चे स्वागत करत असताना वाहतूक पोलिसांनी मंगळवारी एकूण १७ हजार ८०० ई-चालान कापले. पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची यादीही तयार केली असून त्याअंतर्गत वाहनचालकांना दंड ठोठावला आहे.वाहतुकीत अडथळा आणल्याच्या २,८९३, विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांच्या १,९२३, ट्रॅफिक सिग्नल उड्या मारण्याच्या १,७३१ आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने चालविण्यास नकार देण्याच्या १,९७६ घटनांचा अहवालात उल्लेख आहे. शहरात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास ८४२ चालान करण्यात आले असून सीटबेल्ट न लावता वाहन चालविल्यास त्यात आणखी ४३२ जणांची भर पडली आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहनचालकांनी १५३ चालान कापले. तर, वाहन चालवताना फोन वापरणाऱ्यांसाठी १०९ चालान काढण्यात आले. ट्रिपल रायडिंगवर १२३ चालान करण्यात आले, तर चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यास ४० चालान करण्यात आले. ३१ डिसेंबर रोजी धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबद्दल दोन चालानही काढण्यात आले. एकूण ८९ लाख १९ हजार ७५० रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती न्यूज पोर्टलने दिली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर