Mumbai Police Suicide News: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारने शुक्रवारी (१४ जून २०२४) रात्री सायन येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना मयत हवालदाराच्या खिशात सुसाईट नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले. पत्नीशी दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून हवालदाराने आपली जीवनयात्रा संपवली, असे सांगण्यात येत आहे.
विजय साळुंखे (वय, ३८), असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदारचे नाव आहे. साळुंखे हे शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सायनच्या प्रतिक्षानगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास साळुंखे हे त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामादरम्यान पोलिसांना साळुंखे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. पत्नीसोबतच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे साळुंखे यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले.
मृत साळुंखे यांची प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या ३० मे पासून सुट्टीवर होते. साळुंखे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृत हवालदारने रोजच्या कौटुंबिक भांडणांना कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जाळगावच्या भवरखेडा तालुक्यातील धरणगावात अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या दिव्यांग पतीची हत्या केली. पती अडथळा ठरत असल्याने आरोपी महिलेने त्याला मंदिरात दर्शनासाठी जायचे सांगून शेतात नेले आणि विहिरीत ढकलून दिले. ही घटना २ जून २०२४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. प्रकाश धोबी (वय, ३६) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेच्या १० दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला, जेव्हा प्रकाशच्या काकाने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांना प्रकाशच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता ज्योतीने पतीच्या हत्येची कबूली दिली. तिनेच पतीला विहिरीत ढकलून दिल्याची माहिती दिली.