mumbai drone ban : मुंबईच्या आकाशात आजपासून महिनाभर 'ड्रोन' बंदी; काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai drone ban : मुंबईच्या आकाशात आजपासून महिनाभर 'ड्रोन' बंदी; काय आहे कारण?

mumbai drone ban : मुंबईच्या आकाशात आजपासून महिनाभर 'ड्रोन' बंदी; काय आहे कारण?

Updated Oct 31, 2024 10:16 AM IST

Mumbai Police ban flying of drones: मुंबई पोलिसांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स आणि हॉट एअर बलूनवर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे.

मुंबईच्या आकाशात आजपासून 'ड्रोन'बंदी
मुंबईच्या आकाशात आजपासून 'ड्रोन'बंदी

Mumbai Police ban flying of drones for 30 days: देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आकाशात महिनाभर उडत्या वस्तू दिसणार नाहीत. मुंबई पोलिसांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स आणि हॉट एअर बलूनवर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. हे निर्बंध ३१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली.

एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला, ज्यात एक महिन्यासाठी ड्रोनसारख्या उडणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. हे निर्बंध आजपासून २९ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. ड्रोन किंवा इतर कोणत्याही उडत्या वस्तूद्वारे एखाद्याला लक्ष्य केले जाऊ शकते, अशा परिस्थितीत बंदी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ड्रोनवर बंदी घालण्यामागचे कारण?

महाराष्ट्रा येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. तसेच रॅलींचे आयोजन केले जाऊ शकतो. दहशतवादी आणि समाजकंटक व्हीव्हीआयपींना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि पॅराग्लायडर्सचा वापर करत असून मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईत उडत्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असेल.बंदी असतानाही एखादी व्यक्ती ड्रोनसारख्या वस्तू हवेत उडवताना दिसल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम २२३ अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी २६० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात मुंबईतील १५० पोलिसांचा समावेश आहे. तीन वर्षांहून अधिक काळ आपल्या गृहजिल्ह्यात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशीमसह विविध जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ निरीक्षकांसह सुमारे दीडशे मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आणि मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. २८८ पैकी ३६ विधानसभा मतदारसंघ असलेल्या मुंबईत विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागितले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर