Ambani Family Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी सोशल मीडियावर देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणारा एक ३२ वर्षीय गुजराती तरुण असून तो इंजिनीअर आहे.
विरल शाह असं या आरोपीचं नाव आहे. तो वडोदरा येथील रहिवासी आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज सकाळी गुजरातमधील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ffsfir या हँडलवरून त्यानं धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता. 'अंबानी यांच्या लग्नात बॉम्बस्फोट झाल्यानंतर उद्या अर्ध्या जगात उलथापालथ होईल, असं माझं मन मला सांगतंय, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी विवाह सोहळ्याच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आणि लगचेच तपास सुरू केला. हा तपास करता-करता पोलीस वडोदऱ्यापर्यंत पोहोचले त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक विरल शहाला पकडण्यासाठी गुजरातला गेले. तिथं विरलला अटक करण्यात आली. आता पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. त्यानं असं का केलं, हे चौकशीनंतरच कळू शकणार आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि फार्मास्युटिकल टायकून वीरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी झाला. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या भव्य विवाहसोहळ्याला जागतिक पातळीवरील सेलिब्रिटी, राजकारणी, हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आणि आघाडीचे भारतीय क्रिकेटपटू उपस्थित होते.
१२ जुलै ते १५ जुलै या कालावधीत कार्यक्रमस्थळाजवळील रस्ते केवळ लग्न सोहळ्याला येणाऱ्या वाहनांसाठी राखून ठेवण्यात आले होते. हा लग्नसोहळा म्हणजे अनेक दिवस सुरू असलेल्या प्री-वेडिंगचा समारोप होता. जामनगरमध्ये सुरू झालेल्या या सेलिब्रेशनची सुरुवात युरोपमध्ये चार दिवसांच्या लक्झरी क्रूझ सोहळ्यानं झाली आणि त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत अनेक हायप्रोफाईल इव्हेंट्स झाले. प्री-वेडिंग पार्टीमध्ये जस्टिन बीबर, रिहाना, केटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज सारख्या जागतिक स्टार्ससह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स दिले.
संबंधित बातम्या