Mumbai Boat Accident: मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणारी बोट दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक समुद्रात बुडू लागली. यानंतर स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि यलोगेट पोलिस स्टेशन ३ यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्याला सुरूवात केली. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आज दुपारी नौदलाच्या स्पीड बोटची चाचणी सुरू होती. मात्र, त्यावेळी स्पीड बोटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे नौदलाची स्पीड बोड प्रवासी बोटला जोरात धडकली आणि प्रवासी बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.या दुर्घनेनंतर ५६ जणांना जेएनपीटी रुग्णालयात, ९ जणांना नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात, ९ जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि एका व्यक्तीला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईजवळ बुचर बेटावर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाची बोट नौदलाच्या बोटीला धडकून उलटली. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० नागरिक आणि तीन नौदलाचे जवान होते. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी बचावकार्यासाठी ११ क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरतैनात केले आहेत. मात्र, ही कारवाई अजूनही सुरू असून आहे. उद्या सकाळपर्यंत बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत.
संबंधित बातम्या