Mumbai on high alert: मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मुंबई शहरातील सर्व मंदिरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास नागरिकांनी त्वरीत पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.
'मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व मंदिरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणी 'मॉक ड्रिल' करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या. सर्व पोलिस उपायुक्त आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सक्रीयपणे लक्ष ठेवून आहेत', अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा वाढवण्यास सांगण्यात आले. मुंबई पोलिसांनी आम्हाला मंदिराची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. आम्हाला सर्व सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे, असे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले.
तसेच, सर्व पोलीस उपायुक्तांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सातत्याने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जुमा मशिदीसह दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळे असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात शुक्रवारी पोलिसांनी मॉक ड्रिल केली होती. मात्र, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची धमकी दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. दरम्यान, नुकताच गणोशोत्सव पार पडला आता दसरा, दिवाळी आणि दुर्गापूजेच्या तयारीला सुरूवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात फोन करून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी सार्वजनिक आगळीक निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पवन असल्याचे सांगितले. हाजी अली दर्ग्याचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (वय, ४२) यांच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५२, ३५३ (२), ३५३ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने प्रथम २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तक्रारदारांच्या मोबाइलवर फोन केला होता. आरोपीने फोनवर बोलताना असे म्हटले होते की, 'मी दिल्लीतून बोलत आहे. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आला असून लवकरात लवकर दर्गा रिकामा करा.' या फोननंतर परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले.