मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित केल्यानंतर फेरमतमोजणीत शिवसेनेचे रविंद्र वायकर यांना अवघ्या ४८ मतांनी विजयी जाहीर केले. याला विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. वायकर यांच्या मेहुण्याकडून मतमोजणीवेळी मोबाईलचा वापर केल्याचे तसेच त्यांनी ओटीपीद्वारे ईव्हीएम अनलॉक केल्याचा आरोप केला जात आहे. यावर रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की, ईव्हीएम अनलॉक करायला कोणत्याही प्रकारच्या ओटीपीची गरज नाही. आता शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक निकालावरुनठाकरे गट आक्रमक झाला आहे.या मतमोजणीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. आजआदित्य ठाकरे,अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत या मतमोजणी प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेले काही दिवस ईव्हीएमचा विषय गाजतोय. आता याची जगभरात चर्चा होत आहे. याबाबत इलॉन मस्क यांच्या ट्विटचा दाखलाही आदित्य ठाकरे देत म्हटले की, आमचा तो विषय नाही पण आमची एक सीट आहे त्यावर बोलले पाहिजे. त्यात फोन घेऊन कोणी गेले होते का? काही ओटीपी आले होते का?याचा तपास झाला पाहिजे.
अनिल परब म्हणाले की, याबाबत न्यायालयाकडे न्याय मागितला आहे. ४ जूनला जो निकाल लागला त्यात उमेदवार अमोल किर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला. त्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. १९ व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता संपली होती. मतमोजणीचा एक राऊंड संपला की मतं सांगितली जातात.
मतमोजणीचे १४ टेबल असतात त्यानंतर एआरओचा (रिटर्निग ऑफिसर) टेबल असतो. तिथे मतदानाची आकडेवारी सांगितली जाते. मात्र त्यावेळी आरओ व आमच्यात खूप अंतर ठेवले होते. त्यामुळे आम्हाला RO पूढे काय पाठवतो याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती.आम्ही केलेली बेरीज आणि त्यांची बेरीज यामध्ये ६५० मतांचा फरक आल्याचा दावाही परब यांनी केला. त्याचबरोबर संबंधित मतदान केंद्रावरील एआरओवर कोणकोणते गुन्हे आहेत त्याचीही चौकशी झाली पाहिजे.
अनिल परब म्हणाले की, आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी तक्रार नोंदवून चौकशी करावी. त्याचबरोबर आम्ही अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करावे यासाठी अपील करणार आहोत. आम्हाला न सांगताच निकाल द्यायला सुरूवात केल्यानंतर आम्ही आक्षेप घेतला मात्र त्यांनी प्रक्रिया रेटून नेली. याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. मतमोजणी करताना आरओ अधिकाऱ्याला कोणाचा फोन येत होता? वॉशरूममध्ये जाऊन ते काय बोलत होते. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच संबंधित फोनही बदलला असल्याची शक्यता आहे.आम्ही न्यायालयीन लढाई लढणारआहोत. आमचा उमेदवार विजयी घोषित करावा अशी आमची मागणी आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.