मुंबईतील मंत्रालयात एका वृद्ध शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काही वर्षापूर्वी घडली होता. त्यानंतर आणखी एकाने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याचा प्रयत्न केला होता. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका वडापाव विक्रेत्याने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमध्ये तो अडकल्याने सुदैवाने संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे.
ही घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली. मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला जाळीवरून खाली घेतले. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीला ताब्यात घेतलं. अरविंद बंगेरा असं मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली व तेथून खाली उडी मारली. बंगेरा हेबोरिवली येथील रहिवासी असून काही कामानिमित्त आज ते मंत्रालयात आले होते. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही व्यक्ती पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने त्यांचा जीव वाचला.
या व्यक्तीने मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण समोर आलेले नाही. या व्यक्तीचे बोरिवली येथे वडापावची गाडी आहे. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.उडी मारल्यानंतर हा व्यक्ती‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, भारत माता की जय, उद्धव साहेब आगे बढो’, अशा घोषणा देत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
गेल्या काही वर्षात मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. मात्र अशा वारंवार घडणाऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान मंत्रालय सुरक्षा यंत्रणेसमोर आहे.