Mumbai local mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. जार उद्या रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडा. कारण आज देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कारणांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
मध्य रेल्वेने मुंबई विभागात उद्या रविवारी (दि २२) अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित केला आहे. आज शनिवारी मध्यरात्री १२ ते उद्या सकाळी १० पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. या काळात रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची कामे केली जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. या मार्गावरील लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. तर ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकलला थांबा नसेल.
हार्बर मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी अप व डाऊन लोकल रद्द करण्यात येणार असून या काळात सीएसएमटी, कुर्ला व पनवेल वाशी या मार्गासाठी खास लोकल चालवली जाणार आहे. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते ६ पर्यंत प्रवास करता येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव व कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर आज मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. तर डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत.
येथील लोकल गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ वर थांबतील. गोरेगाव-बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल या पाचव्या मार्गिकेवरून सोडल्या जाणार आहेत. या मार्गावरल लोकल राम मंदिर, मालाड, कांदिवली या स्थानकांवर थांबणार नाही याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. पहाटे ४.३० नंतर अंधेरी- विरारद डाऊन जलद लोकल ही संपूर्ण ब्लॉक काळात धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तर चर्चगेट- बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल गोरेगावपर्यंत रद्द करून गोरेगाववरून चर्चगेटकडे वळवण्यात येतील तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.