Maratha Aarakshan Morcha : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून मराठा समाजाचा अतिविराट मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. त्यामुळं मुंबईत वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. त्यासाठी जरांगे यांनी आमरण उपोषणही केलं होतं. सरकारनं काही आश्वासनं दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र, सरकारनं कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यानं मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत येत आहे. राज्यातील गावागावातून मराठा समाजाचे लोक यात सहभागी झाले आहेत.
बुधवारी या मोर्चाचा मुक्काम लोणावळ्यात होता. आज पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. या मोर्चात हजारो आंदोलकांसह शेकडो वाहनांचाही समावेश आहे. हा मोर्चा शहरात आला तर मुंबईत मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप अधिकृत सल्ला किंवा सविस्तर आराखडा जारी केलेला नाही.
मराठा आरक्षण समर्थकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमार्गे मुंबईच्या दिशेनं यायचं होतं, मात्र पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून येण्याची परवानगी दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मराठा आरक्षण मोर्चा वडाळ्यातील ईस्टर्न फ्रीवेमार्गे मुंबईत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे हे बेमुदत उपोषणासाठी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाकडं जाणार आहेत, तर दादरचे शिवाजी पार्क हे आंदोलनाचं ठिकाण आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी यापूर्वी काढलेल्या अधिसूचनेनुसार दक्षिण मुंबई मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईत ट्रेलर आणि ट्रकसह आंतरराज्यीय आणि आंतर जिल्हा बसेस दिवसा बंद राहतील आणि मध्यरात्री ते सकाळी ७ वाजेपर्यंत चालविण्यास परवानगी असेल.
ईस्टर्न फ्रीवेवर कोणत्याही अवजड वाहनांना प्रवेश किंवा ये-जा करता येणार नाही, असंही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई शहरातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सर्व अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११.३० (दक्षिणेकडे) आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत (उत्तरेकडे) प्रवेश आणि ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर सकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत सर्व अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ते मध्यरात्री ते सकाळी ७ वाजेपर्यंत प्रवास पुन्हा सुरू करू शकतात.
सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ या वेळेत बीपीटी रोडवरील मॅलेट बंदर जंक्शन, डॉ. बी. ए. रोडवरील दादर टीटी जंक्शन, आरएके रोडवरील टिळक रोड, जी. डी. आंबेडकर मार्गावरील राम मंदिर चौक, पश्चिम द्रुतगती महामार्गापासून माहीम जंक्शनपर्यंत आणि सेनापती बापट मार्गापासून माटुंगा रोड रेल्वे स्थानकापर्यंत वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
आपत्कालीन वाहने किंवा अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे.