मुंबईतील घाटकोपरमधील एका प्लास्टिकच्या कारखान्यात आग लागल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात असलेल्या एका चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. नारायण नगरच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात सम्राट शाळेजवळ ही कंपनी आहे. भीषण आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांचीही धावपळ उडाली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच, स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंतआग मोठ्या प्रमाणात पसरली. स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
घाटकोपरच्या नारायण नगरमधील एका प्लॅस्टिकचे रॅपर बनविणाऱ्या कारखान्यात ही भीषण आग लागली. कारखान्याच्या गोदामात लागलेली आग मोठ्या प्रमाणात वाढत असून, आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे. अग्मिशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, दाट लोकवस्तीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत. चिंचोळ्या गल्ल्यांमुळेआग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांचा दमछाक होत आहे. या कारखान्याच्या जवळच सम्राट नावाची शाळा आहे. सुदैवाने ही शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळावर सध्या अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असूनस्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि रुग्णवाहिकाही पोहोचली आहे. आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच आगीचं कारणही अद्याप समोर आलेले नाही.
आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तेथून दूर जाण्यास सुरुवात केली आहे. परिसरात आगीचे लोळ उठत असून धूर लांबवरून दिसत आहे. परिसरात बघ्यांची गर्दी वाढली आहे. कंपनीच्या गोदाममध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकत असून अधून मधून स्फोट होत आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
संबंधित बातम्या