Mumbai Shared Cabs Fare News: मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात ५० ते २०० रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक,शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली.
टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई-नाशिक मार्गावरील वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ४७५ रुपये आहे. मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ५७५ रुपये आहे. मुंबई-पुणे मार्गावरील साध्या टॅक्सीचे भाडे ४५० रुपये आहे आणि वातानुकूलित टॅक्सीचे भाडे ५२५ रुपये आहे.
मुंबई ते नाशिक वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी १०० रुपये , मुबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना २०० रुपये आणि मुंबई ते पुणे प्रवासासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त ५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
मुंबई-नाशिक मार्गावरील वातानुकूलित टॅक्सीचे भाडे ६३५ होईल. मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ८२५ रुपये होणार आहे. तर, मुंबई-पुणे मार्गावरील टॅक्सीचे भाडे ५०० रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीसाठी ५७५ रुपये द्यावे लागणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, कधीपासून भाडेवाढ करण्यात येईल, याबाबत अद्याप तारीख निश्चित करण्यात आली नाही. परंतु, एप्रिलपासून सुधारित भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे.
संबंधित बातम्या