मुंबईच्या साकीनाका येथील एका हॉटेलमध्ये कुटुंबातील एका सदस्याच्या कुजलेल्या मृतदेहासोबत चार जणांनी दहा दिवस मुक्काम केल्याची माहिती समोर आली. मृत महिलेच्या ब्रिटनहून परतलेल्या मुलाने शनिवारी रात्री पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.
अब्दुल करीम सुलेमान हलाई (वय, ८२), त्यांची मुलगी नसीमा युसूफ हलाई (वय, ४८), नसीमा यांची २६ वर्षीय मुलगी आणि अब्दुल यांचा मुलगा आणि नातू यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी हॉटेल ग्रँडयूरमध्ये एक रुम बूक केला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ८ फेब्रुवारी रोजी मृत्यू होण्यापूर्वी नसीमा यांना उलट्या आणि जुलाब झाले होते. त्यानंतर त्यांच्या पुतण्याने नसीमा यांचा मुलगा यासीन याला ईमेल पाठवून मृत्युची माहिती दिली.
साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री यासीन ब्रिटनहून आला असता आम्हाला मृत्यूची माहिती मिळाली. "आमच्या पथकाने हॉटेलच्या खोलीत जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, जो जवळजवळ कुजलेला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार यात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे चिमटे यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण आणि कुजलेल्या मृतदेहासोबत हे कुटुंब १० दिवस कसे राहिले? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्व संभाव्य बाबींचा तपास करत आहोत. आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नसीमाचा मृत्यू झाला त्याच दिवशी यासीनला ईमेल लिहिला होता. कुटुंबातील सदस्यांनी इतर कोणालाही माहिती दिली नाही. ते सतत दरवाजा बंद ठेवून कुजलेल्या मृतदेहासोबत राहत होते. त्यांनी दुर्गंधी कशी लपवली, याची आम्हाला खात्री नाही. आम्ही त्यांचे आणि हॉटेल कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहोत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-मुलगी आधी जोगेश्वरीयेथे राहत होते आणि नसीमाच्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी घराबाहेर पडले होते. तेव्हापासून कुटुंबातील पाचही जण शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. ्पैसे कमावण्यासाठी नसीमा ट्युशन द्यायची, त्यात कायद्याची पदवी घेतलेली मुलगी तिला मदत करत होती. यासीन ब्रिटनमध्ये शिक्षण घेत होता आणि गेल्या काही महिन्यांपासून आईला आर्थिक मदत करण्यासाठी पार्ट टाईम कामही करत होता.
शनिवारी रात्री उशिरा मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला, तेथे फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. एस. पी. शिंदे यांनी शवविच्छेदन केले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता. फॉरेन्सिक विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, हा मृत्यू सहा दिवसांपूर्वीझाला असावा, असे दिसते. आम्ही व्हिसेरा नमुने पुढील तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल अपूर्ण आहे.
दरम्यान, पोलिसांनी नसीमा यांच्या मुलीला आर एन कूपर रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले आहे. मात्र, नंतर तिला जोगेश्वरीयेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असून तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.