मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळून प्या! मुंबई महापालिकेनं अचानक 'का' केलं आवाहन?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळून प्या! मुंबई महापालिकेनं अचानक 'का' केलं आवाहन?

मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळून प्या! मुंबई महापालिकेनं अचानक 'का' केलं आवाहन?

Oct 23, 2024 01:06 PM IST

BMC on water supply : पाणीपुरवठ्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी फिल्टर किंवा उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांनो पाणी फिल्टर किंवा उकळून प्या
मुंबईकरांनो पाणी फिल्टर किंवा उकळून प्या

Mumbai Water Supply: पाणीपुरवठ्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी फिल्टर किंवा उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारपासून नदीपात्रातील पाण्याच्या गढूळतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पूर्व उपनगर आणि शहरातील काही भागांतून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

जलशुद्धीकरण केंद्रात गढूळपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी हायड्रोलिक इंजिनीअरिंग विभाग आवश्यक त्या उपाययोजना करत असून, पाणी स्वच्छ आणि शुद्ध असावे, यासाठी पुरेसे क्लोरीन ट्रीटमेंटही देण्यात येत आहे, असे महापालिकेने सांगितले. भातसा जलाशयासह सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा होतो.  

दूषित पाण्याचे दुष्परिणाम आणि उपाय

दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायले जाते. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागते. पण जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात. गॅस्ट्रोमुळे रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्याला सलाइन लावण्याची वेळ येते. ज्या नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, त्यांनी पाणी उकळूनच प्यावे. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळते.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला होता. रायगडमध्ये रविवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि इतर जिल्ह्यांसाठी २० आणि २२ ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ आणि अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा याला कारणीभूत आहे. भारतीय हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पूर्वेकडील वारे आणि पश्चिमेकडील वारे यांच्यात बराच संवाद आहे, ज्यामुळे पाऊस पडत आहे. या पावसानंतर मुंबईत पाऊस थांबायला हवा.’

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर