मुंबई व नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू सुसाईड पाईंट ठरत आहे. याआधी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून एका महिलेने व एका अभियंत्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आज एका ४० वर्षांच्या व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. अटल सेतूवर कार थांबवून हा व्यक्ती कठड्यावर चढला व समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समुद्रात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
पोलीस अटल सेतूवर पार्क केलेल्या कारच्या मदतीने समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून उडी मारत पुण्याच्या बँकरने आत्महत्या केली होती.
घटनास्थळी या व्यक्तीची लाल रंगाची ब्रेझा कार ( MH01DT9188) उभी होती. ही गाडी सुशांत चक्रवर्ती यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे. शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटल सेतूवर ८.५ किमी अंतरावर ही घटना घडली.
सोमवारी सकाळी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे पोलिसांना समजले. अटल सेतू नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी घडल्याचे दिसते. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून त्या व्यक्तीचा स्पीड बोटीच्या साहाय्याने शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलस निरीक्षक, ठाणे अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित घटनेची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान याआधी समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्यांचे मृतदेहही हाती लागले नाहीत.