मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टने यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाच्या आवारात माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळी जादू केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. रुग्णालयाच्या आवारात मानवी कवटीसारख्या काळ्या जादूशी संबंधित काही साहित्य सापडल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.
लीलावती रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या कामकाजावर आणि आरोग्य सेवेवर परिणाम करणारा हा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता म्हणाले, 'वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही दाखल केलेल्या तक्रारींचे एफआयआरमध्ये रूपांतर करण्यात आले. माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तीनहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झालेली चौथी तक्रारही न्यायालयात प्रलंबित आहे. हे काळ्या जादू आणि तांत्रिक क्रियांशी संबंधित आहे.
वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टानेही भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली आरोपींविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टची प्रतिष्ठा आणि पारदर्शकता राखणे हे आपले प्राधान्य आहे, जेणेकरून रुग्णालयाच्या सेवेचा गरजू रुग्णांसाठी योग्य वापर करता येईल, असे मेहता म्हणाले. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड कीस आलेली अनियमितता हा केवळ विश्वासघातच नाही तर रुग्णालयाच्या मूलभूत कामकाजालाही धोका आहे. या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) या आर्थिक गुन्ह्यांचा तातडीने आणि प्रभावी तपास करावा, असे आवाहन त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला केले.
प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ट्रस्टला नियंत्रण मिळाल्यावर विद्यमान विश्वस्तांना रुग्णालयाच्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता आढळली आणि त्यांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. लेखापरीक्षणासाठी चेतन दलाल इन्व्हेस्टिगेशन अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि एडीबी अँड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली होती. ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, आर्थिक हेराफेरी आणि निधीचा अपहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे.
फॉरेन्सिक ऑडिटच्या पाचहून अधिक अहवालांमध्ये दीड हजार कोटीरुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हे पैसे माजी विश्वस्तांनी हडप केले होते, त्यापैकी बहुतेक अनिवासी भारतीय आहेत आणि दुबई आणि बेल्जियममध्ये वास्तव्यास आहेत. लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे वांद्रे पोलिस ठाण्यात तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या. या प्रकरणांचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. तिसऱ्या एफआयआरमध्ये थर्ड पार्टी वितरकांसोबत बेकायदेशीर व्यवहार करून रुग्णालयासाठी १२०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुजरातमधील लीलावती रुग्णालयातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या आणखी एका प्रकरणाचा तपास सुरू आहे.
रुग्णालयाच्या आवारात काळी जादू आणि तांत्रिक हालचालींचे पुरावे सापडल्याचा दावाही मेहता यांनी केला. "आम्हाला आवारात सातहून अधिक कलश सापडले, ज्यात मानवी केस आणि कवटी होत्या. आमच्यासाठी हा धक्का होता. रुग्णालयाचा सन्मान आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर कारवाई सुरूच ठेवणार असून दोषींना शिक्षा होईल, असे विद्यमान विश्वस्तांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या