Mumbai weather update : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून मुंबईत क्वचितच बरसलेला पाऊस आज पुन्हा पडण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
येत्या तीन ते चार तासांत ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, बीड, जालना, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची झळ कायम आहे. या भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. दिल्लीतील नरेला आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, राजधानी दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेनं ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.
नरेला हवामान केंद्रानं शहरातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली, असं आयएमडीनं म्हटलं आहे. नजफगडसह अन्य हवामान केंद्रांमध्ये ४६.६ अंश सेल्सिअस, आया नगर येथे ४४.८ अंश सेल्सिअस, रिज येथे ४५ अंश सेल्सिअस आणि पालम येथे ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
भारतीय हवामान खात्यानं (IMD) राजधानी दिल्लीला 'ऑरेंज' अलर्ट दिला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं राज्यातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राजस्थानातील चुरू ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरलं आहे. आज राज्याच्या काही भागात हलका पाऊसही झाला. श्रीगंगानगर इथं ४५.१ अंश, फतेहपूर आणि बिकानेर इथं प्रत्येकी ४४.८ अंश तापमानाची नोंद झाली. पिलानी इथं ४४.७ अंश सेल्सिअस, संगरिया इथं ४४.३ अंश सेल्सिअस, बाडमेर इथं ४४ अंश सेल्सिअस, तर जयपूर, अलवर आणि जैसलमेर इथं प्रत्येकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जम्मूत उष्णतेची लाट परतली असून शहरातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं, जे या हंगामात सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.
संबंधित बातम्या