मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 16, 2022 09:28 AM IST

Mulund Building Slab Collapsed: मुंबई महानगरपालिकेनं धोकादायक इमारत असल्याचं घोषित केल्यानंतरही काही कुटुंब इमारतीत राहत होती. इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय.

मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना
मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना

Mulund Building Slab Collapsed: मुंबईत एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलुंडमधील नाणेपाडा इथं एका ग्राउंड प्लस टू असं स्ट्रक्चर असणाऱ्या इमारतीत दोन कुटुंब वास्तव्य करत होती. इमारतीला पालिका प्रशासनाने धोकादायक घोषित केलं होतं. त्यानतंरही संबंधित इमारतीमध्ये कुटुंब राहत होते. आता दुर्घटनेनंतर सर्वांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईत मुलुंड पूर्वेला असलेल्या नाणेपाडा परिसरात मोती छाया इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. पालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केल्यानंतरही तिथे वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता स्लॅब कोसळून घडलेल्या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्याला प्राण गमवावे लागले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे देवशंकर शुक्ला (वय ९३) आणि आरती शुक्ला (वय ८७) अशी आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बचावकार्य वेगाने करण्यात आलं. दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

IPL_Entry_Point