अभय कुमार उमेश कुमार झा (वय, २४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. स्टेशनवर नियमित तपासणी दरम्यान बॅग दाखवण्यास नकार दिला. यामुळे रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या बॅगेत एक देशी बनावटीचे ७.६५ एमएम पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे आढळून आले. अभय कुमार उमेश कुमार झा हा मूळचा बिहारचा रहिवासी असून मॉडेलिंगचे काम करतो. रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आर्म्स अॅक्ट १९५९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ इम्प्रेस करण्यासाठीच त्याने पिस्तूल मुंबईत आणल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, आम्हाला त्याची पोलिस कोठडी मिळाली असून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे. यामागे एखाद्या टोळीचा हात असण्याची शक्यता आहे किंवा तो कोणाला शस्त्र पुरवणार होता का? याचाही शोध घेतला जाणार आहे, असे बोरिवली जीआरपीच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मॉडेलिंग आणि टीव्हीमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवून इंजिनीअरिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीची ४५ लाख रुपयांची फसवणूक करून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला भांडुप पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हार्दिक नावाच्या व्यक्तीने बॉलिवूडमधील एका नामांकित प्रॉडक्शन हाऊसशी असलेले संबंध दाखवून सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडिताशी संपर्क साधला होता. तसेच पीडिताला मॉडेलिंगमध्ये मॉडेलिंगमध्ये करिअर बनविण्याची सुवर्णसंधी देण्याचे आश्वासनही दिले.
पीडिताचा विश्वास जिंकल्यानंतर हार्दिकने राहुल चव्हाण नावाच्या व्यक्तीचा तिला मोबाईल नंबर दिला. राहुलने तिला मॉडेलिंगसाठी नोंदणी शुल्क म्हणून २० हजार रुपये आणि पोर्टफोलिओसाठी आणखी २० हजार रुपये भरण्यास सांगितले. तिच्या विनंतीवरून तिच्या वडिलांनी जी-पेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले. त्याच महिन्यात राहुलने तिला वांद्रे येथील हुक्का पार्लरमध्ये बोलावून मॉडेलिंगसाठी लागणारे एक लाख रुपये मागितले. आई-वडील पैसे देणार नाहीत, असे सांगितल्यावर त्याने तिला घरातून सोन्याचे दागिने आणण्यासाठी प्रोत्साहन दिले.
आई- वडिलांच्या अनुपस्थितीत राहुल तिच्या घरी आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फोटोशूटच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जात असे.त्यानंतर हार्दिक आणि श्रेयश पटेल नावाच्या आणखी एका व्यक्तीने सोशल मीडियावर तिच्याशी संवाद साधला आणि अधिक पैसे न दिल्यास तिचे फोटो शेअर करण्याची धमकी दिली. महिन्याच्या अखेरीस तिने राहुलला ४५ लाख रुपये दागिने आणि रोख रक्कम दिली होती. मानसिक आणि शाररिक अत्याचारा कंटाळून पीडिताने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला आणि हा प्रकार उजेडात आला.