Mumbai Building's Wall Collapse News: मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर गांधी चाळीतील नाला साफ करत असताना ही घटना घडली. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निशाद (वय,३०) आणि रामचंद्र सहानी (वय, ३०) अशी मृतांची नावे आहेत. तर, सनी कनोजिया (वय, १९) याच्यावर जीटी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. हे सर्व मजूर असून सोमवारी चर्नी रोड पूर्वेकडील काळबादेवीच्या दादीशेठ आगरी गल्लीत असलेल्या गांधी चाळ येथे नाला सफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी शेजारी असलेल्या म्हाडाच्या तीस फूट लांबीची कंपाऊंड भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यानंतर स्थानिक लोकांनी त्वरीत या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मजुरांचा मृत्यू झाला. तर, एक जणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी २.३८ मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी येथे रविवारी (२६ ऑगस्ट २०२४) सकाळी नऊच्या सुमारास बसने एसयूव्ही आणि मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. मनीषा विजयसिंह भोसले (रा. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांची नुकतीच पलूस येथून भूमी अभिलेख उपअधीक्षक म्हणून पुरंदर येथे बदली झाली होती. राज्य परिवहन विभागाची बस १२ प्रवाशांना घेऊन वाकडेवाडीहून नाशिकच्या दिशेने निघाली होती आणि कार बोपोडी चौकातून वाकडेवाडीच्या दिशेने जात होती. चिखलवाडीजवळ मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस दुसऱ्या लेनमध्ये घुसली. यामुळे बसने कार आणि दुचाकीला धडक दिली.
स्थानिक पोलिस आणि इतर आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी तासाभरातच रस्ता मोकळा केला. बसचालकाविरोधात बीएनएसकलम १०६ (१), २८२, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.