Mumbai Metro 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ चे उद्घाटन केले. या मेट्रो कॉरिडॉरमुळे मुंबईत मोठा विकास होणार आहे. दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेला या मेट्रोमुळे सर्वाधिक चालना मिळण्याची शक्यता असल्याची अपेक्षा रिअल इस्टेट डेव्हलपर्स व या क्षेत्रातील तज्ञांनी वर्तवली आहे.
आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानच्या १२.६९ किमीच्या पट्ट्यात यत्या काळात मोठा बदल होणार आहे. मेट्रो मार्गिकेदरम्यान १० स्थानके आहेत. संपूर्ण मेट्रो ३ कॉरिडॉर सुमारे ३३ किमी लांबीचा आहे. बीकेसी, प्रभादेवी, दादर, वरळी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, मरीन लाइन्स, चर्चगेट, नरिमन पॉईंट, कफ परेड आणि मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या भागांमधील कनेक्टिव्हिटी या मेट्रोमुळे सुधारणार आहे.
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, नवीन मेट्रोमार्गिकेमुळे दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या उपनगरीय भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल व रिअल इस्टेट मार्केटला मोठी चालना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील अनेक रहिवासी वरळी, लोअर परळ, बीकेसी, विमानतळ आणि अंधेरीसारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये काम करतात. या मेट्रोमुळे दक्षिण मुंबईत राहणारे मध्यमवर्गीय आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे, जे कामानिमित्त बीकेसी, मध्य मुंबई किंवा उपनगरात जातात," असे दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट सल्लागारांची शिखर संस्था स्मार्ट (साऊथ मेट्रोसिटी असोसिएशन ऑफ रिअॅल्टर्स) चे अध्यक्ष प्रमोद व्यास यांनी सांगितले.
बीकेसी आणि अंधेरी पूर्व भागात काम करणारे अनेक जण दक्षिण मुंबईत राहणे पसंत करतात. मेट्रो -3 मुळे ही संख्या वाढणार आहे. प्रवासाचे माध्यम वाढल्याने रिअल इस्टेटला फायदा होईल. दक्षिण मुंबईत सध्या नवीन ग्रेड ए व्यावसायिक कार्यालये उभारण्याची योजना आहे. भविष्यात हे कार्यालये वेगाने उभारली जाणार आहे.
सध्या दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील फ्लॅटचे दर प्रॉपर्टीचे वर्ष, परिसर आणि इतर अनेक घटकांनुसार प्रति चौरस फूट ४५ हजार ते १.५० लाख रुपये प्रति चौरस फूट दर आहेत. या ठिकाणी लोढा, गोदरेज, सनटेक, प्रेस्टीज, पूर्वांकारा यांसारख्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रकल्प दक्षिण मुंबईत सुरू आहेत. चांगली जागा उपलब्ध नसल्याने दक्षिण मुंबईतील कार्यालयांचे भाडे १५० ते २५० रुपये प्रति चौरस फुटाच्या आसपास स्थिर झाले होते. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत बीकेसीतील दर वाढले आहेत, असे स्थानिक दलालांनी सांगितले. बीकेसीमध्ये कार्यालयाचे भाडे २५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. अल्पमुदतीच्या व्यवहारासाठी ७०० रुपयांचे दर देखील काहींनी गाठले आहे, अशी माहिती स्थानिक ब्रोकर्सने दिली.
नरिमन पॉईंट येथील ४.२ एकर भूखंडाचे दीर्घकालीन भाडेतत्त्वावर मुद्रीकरण करून किमान ५,१७३ कोटी रुपये उभारण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (एमएमआरसी) योजना आहे. सध्या बाजारात असलेल्या या भूखंडावर पूर्वी विविध राजकीय पक्षांची कार्यालये होती, ती आता स्थलांतरित करण्यात आली आहेत. भूखंड विकसित झाल्यानंतर राजकीय पक्षांची कार्यालये पुन्हा मूळ जागी स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नरिमन पॉईंट येथील ४.२ एकर भूखंडाचे दीर्घकालीन भाडेतत्त्वावर मुद्रीकरण करून किमान ५,१७३ कोटी रुपये उभे करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या साठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर असून एमएमआरसी या उत्पन्नाचा वापर सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गासाठी आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीला व्याज देण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो लाइन ३ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर कुलाबा, वांद्रे आणि सीप्झ सारख्या प्रमुख केंद्रांना जोडणार आहे. ज्यामुळे रिअल इस्टेट बाजारपेठेच्या वाढीस आणखी चालना मिळणार आहे. कफ परेड, नरिमन पॉईंट आणि मरीन लाइन्स सारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये प्रवेश केल्यास गृहखरेदीदार येथे प्रॉपर्टी घेण्यास आकर्षित होतील. याशिवाय दादर, वरळी आणि वांद्रे यांसारख्या महत्त्वाच्या उपनगरांमध्ये बिझनेस हबशी कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने प्रॉपर्टीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या