मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: मुंबईच्या विक्रोळीत अज्ञात वाहनाच्या धडकेत मतिमंद महिलेचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईच्या विक्रोळीत अज्ञात वाहनाच्या धडकेत मतिमंद महिलेचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 10, 2024 09:40 AM IST

Mumbai Hit And Run: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका मतिमंद महिलेचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

Mumbai Accident
Mumbai Accident

Vikhroli Road Accident: मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शनजवळ एका ४२ वर्षीय मतिमंद महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात सोमवारी घडला. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या अपघातातील वाहन ओळखण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया चंद्रकांत सुतार असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुप्रिया ही मानसिकदृष्ट्या अक्षम असून भांडुप पश्चिम येथील कोकण नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहत होती. औषधाच्या गुंगीत ती अनेकदा घर सोडून जायची. दरम्यान, सोमवारी सुप्रियाचा भाऊ सिद्धेशला वीर सावरकर रुग्णालयातून फोन आला की त्याच्या बहिणीचा अपघात झाला.

सुप्रिया ही जेव्हीएलआर जंक्शनवर गंभीर जखमी अवस्थेत पडली असताना एका ऑटोरिक्षा चालकाने तिला वीर सावरकर रुग्णालयात नेले. परंतु, तिची दुखापत गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने सुप्रियाला धडक दिल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, चालकाने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह सुतार कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

WhatsApp channel

विभाग