Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी जर घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे. कारण रेल्वे रूळ व तांत्रिक कामे व देखभाल दुरुस्तीसाठी उद्या रविवारी तिन्ही मार्गवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. याचा परिमाण रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक राहणार नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉककाळात सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील व पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर दरम्यान, सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत पनवेल, बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या सीएसएमटी येथून पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा कार्यरत राहणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाऊन जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर थांबणार नसून महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे फलाट उपलब्ध नसल्यामुळे तर लोअर परळ आणि माहीम स्थानकावरील फलाटांची अपुरी लांबी यामुळे या गाड्या या स्थानकावर थांबणार नाही याची नोंद प्रवाशांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.