Mumbai local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज बाहेर जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक तपासून बाहेर पडा. कारण आज मध्य रेल्वेने लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. सिग्नलच्या आणि विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय विभागाच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या विलंबाने धावत आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलद मार्गांवर जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी व सहावी लाईन सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत डाऊन जलद / अर्ध-जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या या धीम्या डाऊन मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. या काळात काही या मार्गावरच्या गाड्या या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावणार आहे. तर अप मेल एक्स्प्रेस गाड्या या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या गाड्यांना देखील १० ते १५ मिनिटे उशीर होणार आहे.
तर अप हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक घेण्यात आला असून ब्लॉक काळात या मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत व डाउन हार्बर मार्गावर ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे. या काळात कुर्ला - पनवेल स्थानका दरम्यान धावणाऱ्या गाड्या २० मिनिटे उशीराय धावणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक लक्षात घेऊन बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. या मेगा ब्लॉकचा प्रवाशांना फटका बसला आहे. आज सुट्टी असल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोकलसेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मात्र, आज मेगाब्लॉकमुळे ही सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरण्याच्या मुंबईकरांच्या नियोजनावर पाणी पसरले आहे.