छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १० व ११ च्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होणार असून, तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार असून, या दिवशी नोकरदारांना वर्क फ्रॉर्म होम सुविधा देण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने विविध सरकारी व खासगी कार्यालयांना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात यासाठी प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण सध्या रात्री साडेबारा ते पहाटेपर्यंत रात्रंकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. मात्र आता उद्यापासून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तीन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
या कामामुळे गेल्या १५ दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्सप्रेस रद्द तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून, आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज १ हजार ८१० लोकल फेऱ्या धावतात. मात्र आता तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.
जम्बो मेगाब्लॉक कालावधीत ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल ९९ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्यांसह ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तीन दिवस मेगाब्लॉक कालावधीत म्हणजे, शुक्रवारी १६१ लोकलसेवा, शनिवारी ५३४ लोकलसेवा आणि रविवारी २३५ लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ४४४ लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. १ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून २ जूनच्या दुपारी १२.३० पर्यंत यासाठी ब्लॉक घेतला जाईल. या विशेष ब्लॉक दरम्यान प्लॅटफॉर्मच रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे.
संबंधित बातम्या