mumbai marathon 2024 : मुंबई टाटा मॅरेथॉनदरम्यान २ धावपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तब्बल २२ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये १८२० जणांना तातडीची वैद्यकीय मदत द्यावी लागली. या मॅरेथॉनमध्ये पडकांची देखील कमतरता होती. यामुळे गोंधळाचे वातावरण बक्षीस वितरण सोहळ्यात झाले होते.
मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार अनेक धावपटूंना स्नायू दुखी, लचक, थकवा या दम लागणे या सारखे त्रास झाले. २२ धावपटूंना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे टाटा मुंबई मॅरेथॉनचे वैद्यकीय संचालक डॉ विजय डिसिल्वा यांनी सांगितले. मॅरेथॉन दारम्यान, दोन धावपटूंचा मृत्यू देखील झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गोरेगावचे रहिवासी राजेंद्र बोरा (वय ७४) आणि कोलकाता येथील सुव्रदीप बॅनर्जी (वय ४०) या दोघा धावपटूंचा मृत्यू झाला. ज्येष्ठ नागरिक श्रेणीत सहभागी झालेले बोरा सकाळी ८ वाजता मरीन ड्राइव्ह येथे कोसळले. त्यांना फोर्ट येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर पूर्ण मॅरेथॉनपटू बॅनर्जी हे सकाळी ८.३० वाजता हाजी अली जंक्शनजवळ कोसळले. त्यांना तातडीने मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना देखील मृत घोषित केले.
बोरा यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात आणण्यापूर्वी त्यांना दोनदा रूग्णवाहिकेत कार्डिओपल्मोनरी रिझ्युसिटेशन देण्यात आली होती. परंतु त्यांना वाचवण्यात वैद्यकीय पथकाला अपयश आले, अशी माहिती बॉम्बे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ गौतम भन्साळी यांनी दिली. वृद्ध धावपटूसोबत त्यांची मुलगी डॉ पूजा जैन आणि भाऊ नितीन बोराही सोबत होते.
दुसरीकडे, बॅनर्जी यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला दुखापत झाली आणि त्यांना रक्तस्त्राव झाला. त्याच्या डाव्या गुडघ्यालाही जखम झाली होती. त्यांच्या शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती नायर रुग्णालयाचे डीन डॉ सुधीर मेढेकर यांनी दिली.
मॅरेथॉन दरम्यान एकूण १८२० धावपटूंना वैद्यकीय मदतीची गरज भासली. बहुतेकांना स्नायू दुखी, पायात लचक, थकवा आणि दम लागळ्याच्या त्रास झाला. भाभा रुग्णालयात एक धावपटू, बॉम्बे रुग्णालयात १४ , नायर रुग्णालयात एक, जसलोक रुग्णालयात चार आणि लीलावती रुग्णालयात दोघांवर उपचार करण्यात आले.
“दोन धावपटूंना छातीत दुखले, चार जण बेशुद्ध झाले, चौघांना गुडघ्याला दुखापत झाली आणि पायात पेटके आले, एका धावपटूचा खांदा निखळला आणि एका धावपटूला घाबरणे आणि हायपोथर्मियाचा त्रास झाला. डोळे लाल होणे, हाताला दुखापत, पायाला फोड येणे, छातीत दुखणे, स्नायूंना दुखापत होणे, हायपोथर्मिया, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि गंभीर पेटके येणे या सारखा देखील धावपटूंना त्रास झाल्याचे, डॉ डीसिल्वा यांनी सांगितले.