Bhalchandra Mungekar : ...तर टोमॅटोचे भाव चार दिवसात कोसळतील; भालचंद्र मुणगेकर यांनी सुचवला तोडगा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhalchandra Mungekar : ...तर टोमॅटोचे भाव चार दिवसात कोसळतील; भालचंद्र मुणगेकर यांनी सुचवला तोडगा

Bhalchandra Mungekar : ...तर टोमॅटोचे भाव चार दिवसात कोसळतील; भालचंद्र मुणगेकर यांनी सुचवला तोडगा

Updated Jul 31, 2023 01:01 PM IST

Bhalchandra Mungekar on Tomato Prices : टोमॅटोच्या वाढत्या किंमतींवर नेमका काय उपाय आहे? अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर काय म्हणाले पाहा?

Bhalchandra Mungekar
Bhalchandra Mungekar

mumbai marathi grantha sangrahalaya conference : टोमॅटोच्या भावानं दीडशेचा टप्पा ओलांडला आहे. कांदा व बटाट्याच्या खालोखाल टोमॅटोचा वापर जेवणात होत असल्यानं गृहिणी मेटाकुटीला आल्या आहेत. दोन महिन्यांतरही भाव कमी होत नसल्यानं चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे माजी सदस्य, अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. चार दिवस टोमॅटो खाणं आणि खरेदी करणं बंद करा, आपोआप भाव कोसळतील, असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात भाग घेताना त्यांनी हे मत मांडलं. शेती विषयाचे अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी प्रामुख्यानं यावेळी शेती व पर्यावरण विषयावर विचार मांडले. त्यावेळी बाजारातील भाज्यांचे भाव आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी उहापोह झाला.

सध्या टोमॅटोचे भाव किलोमागे १६० ते २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र, शेतकऱ्याला किलोमागे सुमारे ४० रुपये मिळत आहे, अशी माहिती सोमिनाथ घोळवे यांनी दिली. घोळवे यांनी गेल्या ६० वर्षांतील शेतीतील बदल, प्रगती आणि आव्हानांचा आढावा घेतला. याच विषयाला धरून भालचंद्र मुणगेकर यांनी आपलं मत मांडलं.

आपल्याकडं कन्झुमर मूव्हमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. ग्राहक संघटनांचा कोणताही दबाव गट दिसत नाही. त्याचा परिणाम भाव वाढण्यात होत आहे. काय खायचं आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. जीवनावश्यक असलेले पाणी न पिताही माणूस ७२ तास राहू शकतो. त्यामुळं टोमॅटो न खाल्ल्यास काही बिघडत नाही. मुंबईतील सर्व लोकांनी मिळून चार दिवस टोमॅटो खायचा नाही असं ठरवल्यास पाचव्या दिवशी भाव कोसळतील. पण ते करण्याची आपली तयारी नाही, अशी खंत मुणगेकर यांनी व्यक्त केली. एका मोठ्या उद्योगपतीनं महाराष्ट्रातील घाऊक पातळीवर टोमॅटो विकत घेण्याचा सपाटा लावला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘ग्राहकांनी स्वीकारायला शिकलं पाहिजे’

जास्वंदी वांबुरकर आणि प्रयोगशील शेतकरी साईली पलांडे यांनी शेती विषयावरील चर्चेचं सूत्रसंचालन केलं. ‘शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनीच थेट बाजारात जावं असाही सल्ला दिला जातो. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकरी हे प्रयत्न करतही आहेत. मात्र, एखादी पालेभाजी किंवा फळभाजी घेताना लोकांनीही जुळवून घेणं शिकलं पाहिजे. टोमॅटो असाच पाहिजे, ही भाजी काळवंडली आहे हे सगळं सोडून दिलं पाहिजे. भाजी हे इंडस्ट्री प्रॉडक्ट नाही. ते तिथल्या हवामानावर व इतर नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळं आपल्या परिसरात येणाऱ्या पिकांना नाकं मुरडणं लोकांनी बंद केलं पाहिजे,’ असं मत साईली पलांडे यांनी मांडलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर