Mumbai Local Viral News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. यामुळे प्रत्येक वेळी बसून प्रवास करता येईल, याची शक्यता फार कमी असते. मात्र, आता प्रवाशांनी अशा समस्येवरही तोडगा काढला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती भरगच्च लोकलमध्ये चढतो आणि उभा राहायलाही जागा नसताना तो आरामात बसून प्रवास करतो.
व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दी असतानाही लोकलमध्ये चढतो. त्यानंतर आपली बॅग उघडतो आणि त्यातून एक फोल्डेबल प्लासिकचा छोटासा स्टूल बाहेर काढतो. यानंतर स्टूल उघडतो त्याला खिडकीजवळ ठेवतो आणि आरामात बसून प्रवास करतो. या व्यक्तीकडे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. अनेकांना ही कल्पना आवडल्याचे दिसत आहे.
@borivali_churchgate_bhajan या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडिओवर इन्स्टाग्राम युजर्सकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. काहींनी त्याच्या कल्पनेचे कौतुक करत त्याला क्लासिक 'ठग लाइफ' क्षण म्हटले आहे. उभे राहण्यापेक्षा त्याने अधिक आरामदायी जागा कशी मिळवली? याचे कौतुक केल्याशिवाय अनेकांना स्वत: ला आवरता आले नाही. या प्रवाशाचा देशी जुगाड पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. बहुतेक लोकांनी त्याच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘त्याने माझे विचार अक्षरशः प्रत्यक्षात आणले.’
मुंबई लोकल शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. मुंबई लोकलमधून दररोज ७.५ दशलक्षांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकल गाड्या मुंबईच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे रहिवाशांना आपल्या निश्चितस्थळी जाण्यास मदत होते. पश्चिम मार्ग, मध्य मार्ग आणि हार्बर मार्ग या तीन मुख्य मार्गांमध्ये ही प्रणाली विभागली गेली आहे. या गाड्या ३०० किलोमीटरपेक्षा जास्त नेटवर्कवर धावतात आणि दररोज सुमारे २००० गाड्या धावतात. गर्दीच्या वेळी २-३ मिनिटांच्या फेऱ्या असलेल्या या गाड्यांमध्ये विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी गर्दी असते.