Mumbai News: मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने ३३ वर्षीय तरुणाची हत्या केली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु, २० नोव्हेंबर रोजी या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मुंबई लोकलमधून प्रवास करताना झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
अंकुश भालेराव, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंकुश हा घाटकोपर (पूर्व) येथील एका दारूच्या दुकानात काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा १४ नोव्हेंबर रोजी ८.५३ मिनिटांनी घाटकोपर स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्यात चढला. प्रवासादरम्यान सीटवर बसण्यावरून त्याचा एका अनोळखी अल्पवयीन मुलासोबत वाद झाला. त्यांच्यात धक्काबुक्की देखील झाली. त्यावेळी आरोपी मुलाने अंकुश याला जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी मयत अंकुश हा नेहमीप्रमाणे घरातून कामावर जाण्यास निघाला. त्यानंतर तो सकाळी ९.५० मिनिटांनी घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर उतरला, तिथे आरोपी गेल्या अनेक तासांपासून त्याची वाट पाहत होता. तितक्यात आरोपीला अंकुश दिसला. त्याने कशाचाही विचार न करता अंकुशच्या पोटावर आणि छातीवर वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत अंकुश गंभीर जखमी झाला आणि तो जमीनीवर कोसळला. प्रवाशांनी त्याला त्वरीत जवळच्या राजावाडी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत्युपूर्वी पोलिसांनी त्याचा जाब नोंदवून घेतला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपीने अंकुशवर चाकूने हल्ला केल्यानंतर मोठ्या भावाकडे मदत मागितली. यानंतर त्याच्या मोठ्या भावाने या गुन्ह्यात वापरलेला चाकू लपवून ठेवला. पोलिसांना ओळख पटवता येऊ नये म्हणून त्याने आपले केस कापले.
रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुशवर चाकूने हल्ला करताना आरोपीने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला होता. घाटकोपर स्टेशनमधून बाहेर पडल्यावर त्याने मास्क काढला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तो गोवंडी येथील रहिवाशी असल्याचे समजले. यानंतर पोलिसांना आरोपीच्या मोठा भाऊ काम करत असलेले ठिकाण कळले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीच्या मोठ्या भावाला अटक केली. याप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्यांच्या मोठ्या भावाविरोधात कलम १०३ (१) (हत्येची शिक्षा), १०९ (१) (हत्येचा प्रयत्न), ३५१ (३) (गुन्हेगारी धमकावणे) आणि २३८ (पुरावा गायब करणे) अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. तसेच गु्न्ह्यात वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला.