Mumbai Metro Viral News: मुंबईतील मेट्रो स्थानकांवर शौचालय वापरण्यासाठी प्रवाशांकडून एक फॉर्म भरून घेतला जात आहे. एका प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फॉर्मचा फोटो शेअर केल्याने नव्या चर्चेला उधाण आले. या टॉयलेट पास किंवा फॉर्ममध्ये प्रवाशाचे नाव, फोन नंबर, स्वाक्षरी, तारीख, तिकीट टोकन नंबर आणि इतर तपशील मागितले जात आहेत.
संबंधित प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर मुंबई मेट्रो संबंधित एक पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले आहे की, 'मी घाटकोपर मेट्रो स्थानकावरून डीएन नगर मेट्रो स्टेशनवर असा प्रवास केला. मात्र, डीएन नगर मेट्रो स्टेशनवर टॉयलेट जाण्यापूर्वी मला एक फॉर्म भरण्यासाठी देण्यात आला. फक्त टॉयलेटमध्ये जाण्यासाठी फॉर्म भरण्याची काय गरज?' असा प्रश्न प्रवाशाने उपस्थित केला.
प्रवाशाने पुढे सांगितले की, 'घाटकोपर स्थानकावर पुन्हा त्याला टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी तसाच फॉर्म भरण्यासाठी सांगितला गेला. हा फॉर्म भरताना प्रवाशांकडून कोणतेही पैसे आकरले जात नाहीत. पण वारंवार हा फॉर्म भरणे विचित्र वाटते. एवढेच नव्हेतर, अंधेरी मेट्रो स्थानकावरही त्याला या गोष्टींना सामोरे जावा लागले.' सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर मुंबई मेट्रोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
मेट्रोत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या चप्पलने दुसऱ्या प्रवाशाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भांडणाचे कारण समजू शकलेले नाही. या व्हिडीओमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद होताना दिसत आहे. तेवढ्यात एक माणूस चप्पल काढून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर मारतो. लगेच समोरची व्यक्ती प्रतिक्रिया देते आणि त्याला दोनदा चप्पलने मारहाण करते. नंतर एक व्यक्ती त्यांच्यात मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते. ही पोस्ट ३० जुलै रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. या शेअरवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आहेत.