Man Rapes Daughter In Malad: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना मुंबईच्या मालाड येथून बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जून महिन्यात घडली असून पीडित मुलीने आपल्या आईला अत्याचाराची माहिती दिल्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली. जूनमध्ये आरोपीने घरी कोणी नसताना आपल्या मुलीवर बलात्कार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता करू नये, अशी धमकी दिली. नुकताच मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आईने दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
आरोपी पित्याविरुद्ध बीएनएस कलम ६५ (२), ६८ (अ) आणि पोक्सो कलम ४,१०,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बदलापूरच्या एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली हे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनी करण्यात आली. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागणी केली जात आहे. या घटनेची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली.
शाळेतील आरोपी शिपायाला कल्याण न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या क्रूर घटनेविरोधात वाढता दबाव आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय सप्टेंबरमध्ये शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबतच्या याचिकेवरही विचार करणार आहे. अशीच आणखी एक घटना बदलापुरात २७ ऑगस्ट रोजी घडली होती, ज्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे शारीरिक शोषण करणारा एक तरुण मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पळून गेला होता. पोलिसांनी सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली.