मुंबईत एका ग्राहकाने स्विगीवरून पनीर बर्गर ऑर्डर केली असता त्याच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये पनीर ऐवजी चक्क चिकन बर्गर मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे वैतागलेल्या या ग्राहकाने थेट स्विगीकडे तक्रार केली आहे. या ग्राहकाने ज्या रेस्टॉरंटमधून हे खाद्यपदार्थ मागवले होते त्या सांताक्रूज (पूर्व) भागातील रेस्टॉरंटला त्याने भेट दिली आणि तेथील अस्वच्छतेबाबत एक पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर या ग्राहकाला तेथे भयंकर अस्वच्छता दिसली. तेथील अस्वच्छ वातावरणाबद्दल ग्राहकाने पोस्टमध्ये सविस्तर लिहिलं आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ग्राहक लिहितो, ‘मित्रांनो, कलिना मुंबईतील सांताक्रूझ- पूर्व कलिना येथील @freshmenu टॅग करा’. येथील अस्वच्छ वातावरण इतरांना दाखवून त्याची दखल घेण्याचे आवाहन या ग्राहकाने केले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या पोस्टवर ग्राहक आणि डिलिव्हरी रायडर्स या दोघांच्याही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी इतरही काही रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
एका डिलिव्हरी ब्वॉयने कमेंट केलीय की, डिलिव्हरी ब्वॉय म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या आहे... ज्या हॉटेल्समध्ये डायन-इन नाही अशा हॉटेलमधून कधीही ऑर्डर करू नका... कारण जवळपास सर्वच हॉटेलमध्ये स्वच्छता राखली जात नाही!
'झोमॅटो रायडर' नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने अशीच भावना व्यक्त केली आहे. तो लिहितो, ‘७० टक्के रेस्टॉरंट्समध्ये हीच परिस्थिती आहे. मी त्या ठिकाणाची आधी पाहणी करतो. अशा जागा पाहून मी ग्राहकांना सावध करतो. अशा रेस्टॉरंटमधून पुन्हा खाद्यपदार्थ मागवू नका असं मी ग्राहकांना सांगतो. निर्णय त्यांना घ्यायचाय.’
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, मी स्वतः एक रेस्टॉरंट सुरू केले होते. मी सर्वोत्कृष्ट पदार्थ वापरायचो, स्वच्छता ठेवायचो, परंतु ग्राहक अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी पैसे मोजत नाहीत. ग्राहक नेहमी स्वस्त किंमतीतील खाद्यपदार्थांच्या शोधात असतात. असं असेल तर त्याच पद्धतीचे पदार्थ तुम्हाला मिळणतील.' एका युजरने लिहिले की दर्जेदार खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेच्या संकल्पना या फार दूर आहेत. परंतु येथे जे दाखवले ते फारच भीतीदायक आहे!"
दिल्ली शहरात राहणारा एक यूजर लिहितो, ‘संपूर्ण दिल्लीत हीच परिस्थिती आहे. मी तर यावर सट्टा लावू शकतो...... दिल्लीत उरल्या-सुरल्या १० ते २० टक्के चांगल्या भागात उभारलेल्या काही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये पदार्थ खूप महाग असतात.’
‘हिंदुस्तान टाइम्स’ने फ्रेशमेनूची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचा प्रतिसाद आल्यानंतर ही बातमी अपडेट करण्यात येईल.
संबंधित बातम्या