amazon online fraud : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. पूर्वी कुठलीही गोष्ट विकत घ्यायची असल्यास आपण थेट बाजारात जाऊन वस्तु खरेदी करायचो. मात्र, आता हा ट्रेंड बदलला आहे. बहुतांश नागरिक आता ऑनलाईन खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, या खरेदीत देखील आता फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईत अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
एका व्यक्तीने ५५ हजार रुपयांचा मोबाईल ॲमेझाॅनवरून मागवला. हे पार्सल जेव्हा घरी आले तेव्हा त्याला धक्का बसला. पार्सल उघडल्यावर त्यात फोन ऐवजी अर्धा डझन चहाचे कप आढळले. याबाबत या युवकाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.
नागरिक संचालित बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कंपनीतील उप अभियंता असलेले अमर चव्हाण यांनी १३ जुलै रोजी ॲमेझाॅनवरून टेक्नो फँटम व्ही फोल्ड मोबाईल फोन मागवला होता. या साठी त्यांनी तब्बल ५४,९९९ रुपये ऑनलाइन भरले. ऑर्डर केलेल्या दोन दिवसानंतर त्यांच्या घरी पार्सल आले. त्यांनी हे पार्सल उघडल्यावर त्यांना फोन ऐवजी चहाचे कप आल्याने त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी त्यांनी ॲमेझॉन तसेच विक्रेत्या कंपनीशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र, त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर वैतागून चव्हाण यांनी ॲमेझॉन आणि पार्सल देणाऱ्या कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी Amazon India ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांचे प्रमाण देशात जास्त आहे. यामुळे आता चोरट्यांनी या प्रकारे शॉपिंग करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले आहे. सायबर चोरटे विविध प्रकारचे मार्ग अवलंबून ही फसवणूक करत आहेत. ऑर्डर केलेल्या वस्तु मध्येच गायब केल्या जात आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करतांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतीवस्तु मागवण्याच्या आधी योग्य साईट आहे की नाही हे पाहून ऑर्डर करा असे देखील पोलिस म्हणाले.
संबंधित बातम्या