Mumbai ATM Break News: व्हिडिओ शेअरिंग कंपनी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकता येतात. मात्र, काहीजण त्याचा गैरवापर करताना दिसून येत आहेत. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला पोलीसांनी अटक केली. या तरुणाने हिंदी चित्रपट आणि युट्युबच्या माध्यमातून एटीएम फोडण्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर मुबंईतील सांताक्रूझ पूर्व येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो पालघर येथील रहिवाशी आहे. जावेद हा १ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सांताक्रूझ पूर्व येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये शिरला. त्यानंतर त्याने कटरचा वापर करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सतत प्रयत्न करूनही त्याला एटीएममधील पैसे काढला आले नाही आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला. चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच बँक अधिकारी नवीन करकल यांनी वाकोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना संशयित आरोपी निळ्या रंगाच्या दुचाकीवरून धोबीघाट परिसरात जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून ग्राइंडर ब्लेड, दोन ब्लेड, एक कटर, चष्मा, हातमोजे, एक पाईप आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील केंगार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जावेदची कसून चौकशी केली असता त्याने युट्युब व्हिडिओतून एटीएम फोडण्याची माहिती मिळवल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या