मुंबईतील दिंडोशीमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी व अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले आहेत. मदत व बचावकार्य सुरू आहे. जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात हजी बापू रोडवर गोविंद नगर भागात ही घटना घडली. दुपारी १२ वाजता ही दुर्घटना घडली. येथील नवजीवन इमारतीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात नेमका कसा घडला याची माहिती सध्या समोर आली नाही.
नवजीवन इमारतीच्या २० व्या मजल्याचे काम सुरु होते. या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला. यामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारावर मालाडमधील देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून हा स्लॅब हटवला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्लॅब कोसळल्यामुळे खाली असलेले कामगार जखमी झाले. अतिरक्तस्राव झाल्यामुळे ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर झोपडीधारक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना घेराव घातला. झोपडीधारकांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी देखील घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांना विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून आजच एसआरए मुख्याधिकारी कल्याणकर यांना पत्र लिहून तात्काळ काम थांबावणायासाठी आदेश काढण्याची विनंती करणार आहे.