Mumbai Govandi Fire News: मुंबईतील गोवंडी येथील एका चाळीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नगर परिसरातील बेगनवाडी येथे शनिवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
या आगीत विजेच्या वायरिंग आणि आस्थापना, प्लॅस्टिकशीट, घरगुती वस्तू, लाकडी फळ्या, फर्निचर आदी घरगुती साहित्य जळून खाक झाले. सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या आदर्श नगरमधील झोपडपट्टीत १७ फेब्रुवारीला पहाटे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत सुमारे १०-१५ घरे जळून खाक झाली. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि मुंबई पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.